Girgaon via Dadar

रंगभूमीवर प्रगटणारी जिवंत धग
“गिरगाव व्हाया दादर”
महाराष्ट्र राज्य स्थापनेचा सुवर्ण महोत्सवी वर्षाचा उत्सव मागच्या वर्षी सुरु असताना ज्या चळवळीमुळे संयुक्त महाराष्ट्राचा अमृत कलश आपल्या हाती आला, एकशे पाच हुतात्म्यांनी आपले प्राण ज्या चळवळीसाठी दिले,ज्या शेकडो ज्ञात-अज्ञात कष्टकरी लोकांनी हा लढा यशस्वीपणे लढवला,त्यांच्या बलिदानामागची आग विस्मृतीत जाते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. ह्या उत्सवी वातावरणात अस्वस्थ झालेल्या मुंबईतल्या महविद्यालयीन नाट्यक्षेत्रातल्या मंडळींना त्यामुळेच हा इतिहास आजच्या पिढीसाठी जिवंत करणे आपले कर्तव्य आहे असे वाटले आणि त्यांनी ‘गिरगाव व्हाया दादर’ ह्या एकांकिकेला आकार दिला.ज्या काळात ही चळवळ घडली त्या काळाशी संबध सोडाच पण त्या काळात जन्मही न झालेल्या ह्या पिढीने त्या काळातल्या इतिहासाचा बारकाईने अभ्यास करून केवळ सत्य घटना आणि संदर्भ ह्यांचा आधार घेत ही एकांकिका उभी केली.
'सवाई'सह अनेक मान्यवर स्पर्धांमध्ये पन्नास एक पारितोषिकांची सर्वोत्कृष्टतेची मोहोर उमटलेल्या ह्या हृषीकेश कोळी लिखित अमोल भोर दिग्दर्शित एकांकिकेचे आता रिद्धी निर्मित आणि नवनीत प्रकाशित दोन अंकी 'गिरगाव व्हाया दादर' ह्या नाटकात रुपांतर झाले आहे.मुळातच मराठी माणसांनी दिलेला हा लढा इतका आक्रमक आणि अनेक नाट्यमय घटनांनी भरलेला होता की त्यामुळे एकांकिकेचे नाटक होताना त्या काळातल्या ऐतिहासिक घटनाच एक विस्तृत पटच आपल्यापुढे उलगडत जातो.ह्या नाटकातला चळवळीपाठचा भावनाआवेग सर्वसामान्य प्रेक्षकालाही खिळवून ठेवणारा आहे.
'गिरगाव व्हाया दादर' हे केवळ एक ऐतिहासिक सामजिक नाटक नसून मराठी अस्मितेची रंगभूमीवर प्रगटणारी जिवंत धग आहे. 'मराठी बाणा' पुन्हा नव्याने तपासून पाहण्याच्या सध्याच्या काळात, परस्परविरोधी मतांच्या मराठी नेतृत्वाखाली ‘पूर्वी घडून गेलेल्या’ जनसमूहाच्या ह्या लढ्याचे युवा पिढीने घडवलेले दर्शन आजच्या काळात प्रत्येकाने आत्मपरीक्षणासाठी अनुभवणे गरजेचे आहे. संपूर्णपणे प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या वास्तववादी नाटकांची परंपराचा मराठी नाटकात थोडी असल्यामुळे मुंबईत जेव्हा 'गिरगाव व्हाया दादर' सादर झाले तेव्हा समीक्षकांनी कौतुकाची दाद दिली तर प्रेक्षकांनी या नाटकाला सलग हौसफुल्ल प्रयोगांचा प्रतिसाद दिला.
संयुक्त महाराष्ट्र लढ्यात महत्वाची भूमिका बजावलेल्या मुंबई - पुण्यासह आता संपूर्ण महाराष्ट्रात प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात हे नाटक सादर होत आहे .
मोजकेच कलाकार.बॉक्ससेट,मर्यादित प्रकाशयोजना ही समीकरण मोडत ५० जणांच्या टीमसह ह्या प्रयोगाच्या निर्मित्तीचे धाडस विलास वाघमारे ह्यांनी केले असून नेपथ्य सचिन गावकर आणि प्रकाशयोजना भूषण देसाई ह्यांची आहे.अभिजित पेंढारकर ह्यांनी संगीत दिलेल्या ह्या नाटकात नम्रता आवटे, ऋतुजा बागवे, स्वप्निल हिंगडे ह्यांच्यासह अतुल सणस, महेश वरवडेकर, प्रदीप डोईफोडे, रत्नाकर देशपांडे, सिद्धेश परब, आशिष मुंबईकर, राकेश पाटील, सुमित परुळेकर, स्नेहा साळवी, पुरुषोत्तम हिलेर्कर, हनुमंत चौधरी, दिग्विजय चव्हाण, वर्षा मानकामे, सचिन नवरे, संतोष पाटील, उमेश कणसे, अजय गटलेवार, संतोष खाडे, मैत्रेयी जाधव, चेतन शिंदे, महेश वडवलकर सहकलावंत आहेत.